तामिळनाडूचा मुख्यमंत्री कदापिही होऊ देणार नाही : नवा पक्ष स्थापन करण्याचे मदुराईत दिले संकेत
वृत्तसंस्था/ मदुराई
द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते एम.के. अलागिरी यांनी मदुराई येथील रोड शोदरम्यान सक्रीय राजकारणात परतण्याचे संकेत दिले आहेत. यादरम्यान त्यांच्या समर्थकांनी ‘अंजा नेंजम’ म्हणजेच शूर हृदयाचे म्हणून घोषणा दिल्या आहेत. अलागिरी यांनी यावेळी द्रमुक अध्यक्ष आणि स्वतःचे बंधू एम.के. स्टॅलिन यांना जोरदार लक्ष्य केले आहे. स्टॅलिन कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, मी आणि माझे समर्थक त्यांना रोखू असे अलगिरी यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री तसेच एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र अलागिरी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःच्या पुढील कृतियोजनेसंबंधी बैठक घेत चर्चा केली आहे. आपण लवकरच पुढील पावलाची घोषणा करणार आहोत. दमुकमधून हकालपट्टी करण्याइतपत मी कोणती चूक केली होती हे आजवर मला उमगलेले नाही. स्टॅलिन यांनी माझा विश्वासघात केल्याचे अलागिरी म्हणाले.
पदाची लालसा नव्हती
माझ्यासोबत का म्हणून विश्वासघात करण्यात आला हे माहित नाही. मी केवळ पक्षाचा कार्यकर्ता राहू इच्छित होतो. कधीच कुठल्या पदाची लालसा बाळगली नव्हती. एकेकाळी एमजीआर यांचे वर्चस्व असलेल्या मदुराईला द्रमुकचा बालेकिल्ला करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती, असे अलागिरी यांनी म्हटले आहे.
करुणानिधींशी तुलना गैर
द्रमुकच्या फलकांवर स्टॅलिन यांना भावी मुख्यमंत्री ठरविण्यात येत आहे, परंतु असे कदापिही घडणार नाही. माझे समर्थक स्टॅलिन यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. द्रमुकच्या एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱयाने स्टॅलिन यांनी कलैंगर यांच्यापेक्षा चांगले काम केल्याचे विधान केले. हे विधान ऐकून मला लाजिरवाणे वाटले. स्टॅलिन यांची तुलना करुणानिधी यांच्याशी कशी करू शकतात, असे प्रश्नार्थक विधान अलागिरी यांनी केले आहे.
7 वर्षे गप्प, आता निर्णय घेणार
अनेक वेळा द्रमुकला संकटातून मी बाहेर काढले, तर स्टॅलिन यांनी पक्षातील पद राखण्यासाठी माझा वापर केला. मी 7 वर्षांपर्यंत गप्प बसलो होतो. नवा पक्ष स्थापन करावा असा समर्थकांचा आग्रह आहे. लवकरच निर्णय घेणार असल्याचे अलागिरी यावेळी म्हणाले.