प्रतिनिधी / सातारा
सध्या सायबर गुन्हे मोठय़ा प्रमाणात वाढले असून बँकांची एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. एटीएम मशीनशी छेडाछाडी करत 7 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साताऱयातील पाच एटीएम मशीनमधून ट्रांझेक्शन करत अज्ञाताने सुमारे 2 लाख 35 हजार रुपये लंपास करत बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत बँकेचे मॅनेजर संजय तुकाराम गव्हाळे (रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सप्टेंबर महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारा शहरातील पाच एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये एटीएम मशीनमध्ये आलेल्या एररचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे. एटीएमचा कार्डचा वापर करत इतरांच्या अकौंटवरुन ट्रांझेक्शन करुन त्यातील सुमारे 2 लाख 35 हजार रुपयांची रक्कम लंपास केलेली आहे.
सध्या सातारा शहरात एटीएम मशीन देखील सुरक्षित राहिलेली नाहीत. वास्तविक एटीएम मशीन सेंटरवर सुरक्षा रक्षक असून देखील असे प्रकार घडत आहेत. तर अनेक बँकांच्या एटीएम मशीन सेंटरला सुरक्षा रक्षकच नसल्याचेही समोर येत आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या फसवणुकीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे करत आहेत.