पॅरिस
प्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेतील मार्सेले-पीएसजी लढतीत स्टॉपेज टाईममध्ये नेमारसह चक्क 5 खेळाडूंना रेड कार्ड देण्यात आले. या लढतीच्या माध्यमातून मार्सेलेने पीएसजीवर 9 वर्षानंतर पहिलाच विजय नोंदवला. या लढतीत मार्सेलेने 1-0 असा निसटता विजय मिळवला. नेमारला प्रतिस्पर्धी सेंटर हाफ अल्वारो गोन्झालेझला धक्का दिल्याबद्दल बाहेर व्हावे लागले. व्हीडिओ रिप्ले पाहून हा निर्णय घेण्यात आला. नेमारने मात्र वंशभेदातून हा निर्णय घेतला गेल्याची टीका केली आहे.
या सामन्यानंतर नेमारने काही ट्वीट करत आपला संताप जाहीर केला. विंगर फ्लोरियनने 31 व्या मिनिटाला केलेला गोल या सामन्यातील एकमेव ठरला. कोरोनातून सावरल्यानंतर विंगर डी मारियासह नेमार येथे प्रथमच खेळत होता. याशिवाय, मार्सेलेचा पीएसजीवर मिळवलेला हा नोव्हेंबर 2011 नंतरचा पहिला विजय ठरला. या हंगामात पीएसजीसाठी हा सलग तिसरा पराभव ठरला. यापूर्वी ऑगस्टमध्ये बायर्न म्युनिचविरुद्ध चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये व गुरुवारी लेन्सविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.
1984 नंतर हंगामातील पहिले दोन सामने गमावण्याची देखील पीएसजीसाठी ही पहिलीच वेळ आहे.