खराब फॉर्ममुळे ऋतुराज गायकवाडवर दडपण, सलग तीन पराभवांमुळे रविंद्र जडेजा देखील चिंतेत
नवी मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल हंगामात सातत्याने झगडत असलेले चेन्नई सुपरकिंग्स व सनरायजर्सचे संघ आज (शनिवार दि. 9) दिवसभरातील पहिल्या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांना अद्याप एकही विजय प्राप्त करता आलेला नसून विजयाचा हा दुष्काळ आजच्या लढतीत संपुष्टात आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असेल. ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर बरेच दडपण असेल. शिवाय, सलग तीन पराभवांमुळे कर्णधार रविंद्र जडेजा देखील चिंतेत आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नईला यंदा विशेषतः फलंदाजीत अधिक झगडावे लागले असून या पार्श्वभूमीवर ऋतुराजला सूर सापडणे या संघासाठी विशेष महत्त्वाचे असेल.
मागील आवृत्तीत सर्वाधिक धावा जमवणाऱया ऋतुराजला फूटवर्कवर बरेच झगडावे लागले असून मागील 3 सामन्यात तो एकदा शून्यावर तर दोनवेळा एका धावेवर बाद झाला आहे. तो स्वस्तात बाद झाल्याने याचा चेन्नईला मोठा फटका बसणे साहजिक होते. ऋतुराजने 2021 मध्ये 16 सामन्यात 635 धावांची आतषबाजी केली होती.
मोईन, रायुडूचा फॉर्म महत्त्वाचा
वास्तविक, चेन्नईची फलंदाजी लाईनअप खोलवर आहे. मात्र, ही बाब पंजाबविरुद्ध फलद्रूप ठरु शकली नाही. त्यावेळी 180 धावांचा पाठलाग करताना त्यांना केवळ 126 धावांवर समाधान मानावे लागले होते. रॉबिन उत्थप्पाने एक अर्धशतक झळकावले असून मोईन अली, अम्बाती रायुडू यांना अद्याप सूर सापडलेला नाही. कर्णधार रविंद्र जडेजाला देखील आणखी प्रभावी खेळ साकारण्यासाठी अनुभव पणाला लावावा लागणार असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची त्याला येथेही साथ लाभेल.
चेन्नईच्या मागील लढतीत शिवम दुबेचे अर्धशतक ही त्यांच्यासाठी एकमेव दिलासा देणारी बाब ठरली होती आणि आज त्याच्याकडून संघाला आणखी एका बहारदार खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्हो चेन्नईतर्फे सर्वात सातत्यपूर्ण योगदान देण्यात यशस्वी ठरला असून त्याने पंजाबविरुद्ध मागील सामन्यात 3 बळी घेतले होते.
डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट ख्रिस जॉर्डन (2-23) व ब्रेव्हो यांनी धावांचा ओघ रोखण्यात कमालीचे यश प्राप्त केले होते. मात्र, त्यांना अन्य सहकारी गोलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभणे महत्त्वाचे ठरेल. दीपक चहर व ऍडम मिल्ने यांच्या गैरहजेरीत चेन्नईला गोलंदाजीत झगडावे लागत आले असून मुकेश चौधरी नव्या चेंडूवर अद्याप सेट झालेला नाही, असे चित्र आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः रविंद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, दीपक चहर, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरनजीत सिंग, मुकेश चौधरी.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझल हक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.
सनरायजर्ससाठी नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार
केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद संघाला यंदा दोनवेळा धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले असून त्यांना राजस्थानविरुद्ध 61 धावांनी तर आयपीएल पदार्पणवीर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध 12 धावांनी पराभव पत्करावे लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, आजच्या लढतीत नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागावा, अशी त्यांची अपेक्षा असणार आहे.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, विदेशी खेळाडू रोमारिओ शेफर्ड, फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर बळी घेत आले असले तरी या संघाचे फलंदाज मात्र सातत्याने अपयशी ठरत आले आहेत. केन विल्यम्सन अद्याप लक्षवेधी खेळी साकारु शकलेला नाही आणि अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी व निकोलस पूरन यांना उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आलेले नाही.
एडन मॅरक्रम व वॉशिंग्टन सुंदर यांनी राजस्थानविरुद्ध उत्तम डाव साकारले. पण, ते लखनौविरुद्ध तग धरु शकले नव्हते. डीवाय पाटील स्टेडियमवरील या लढतीत विल्यम्सनला संघसहकाऱयांकडून खेळ उंचावण्याची अपेक्षा असणार आहे.