वृत्तसंस्था/ स्ट्रासबर्ग, फ्रान्स
प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया बियान्का अँडेस्क्यूने येथे सुरू असलेल्या स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. पोटदुखी होत असल्याने दक्षता म्हणून या स्पर्धेतून माघार घेतल्याचे तिने स्पष्ट केले.
कॅनडाच्या अँड्रेस्क्यूला या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले होते आणि पहिल्या फेरीत तिने बेल्जियमच्या मारियाना झानेवस्कावर विजय मिळवून दुसरी फेरीही गाठली होती. ‘पोटाचे स्नायू दुखावले असल्याने खबरदारी म्हणून मी या स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. पुढील आठवडय़ातच पेंच ओपन स्पर्धा होणार असल्याने मला कोणताही धोका स्वीकारायचा नव्हता. तशी ही दुखापत गंभीर स्वरूपाची नसून थोडेसे अस्वस्थ वाटत आहे, इतकेच,’ असे ती म्हणाली. 2019 मध्ये तिने अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिची दोन वर्षे कठीण गेली आहेत. यावर्षीही तिला मियामी स्पर्धेतील अंतिम लढतीतून 3 एप्रिल रोजी माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तिला कोरोनाचीही लागण झाली होती.