सरकारच्या तज्ञ समितीची शिफारस, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कोविडची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याची भीती आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली असल्याने स्तनपान करणाऱया महिलांना लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी शिफारस गोवा सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने केली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी शनिवारी बांबोळी येथे आपल्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यात तज्ञ समितीकडून तिसऱया लाटेदरम्यान मुलांवरील उपचार नियमावली सूचविण्यात आली.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्तनपान करणाऱया महिलांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे सूचविण्यात आले. ही शिफारस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील कृती दलासमोर ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
देशात 18 वर्षांपेक्षा कमी वयाची सुमारे 3.5 ते 4 लाख मुले आहेत. त्यात 12 वर्षांखालील मुलांची संख्या 2.5 लाख आहे. देशात कोरोना लाट आल्यापासून लागण झालेल्या एकूण बाधितांपैकी 7 ते 8 टक्के मुले होती. दुसऱया लाटेत ती 12 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अशावेळी आता तिसऱया लाटेचा धोका अतिप्रखर असण्याची भीती आरोग्य विभागानेच वर्तविली असल्याने तिचा सामना करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक बालरोग इस्पितळ स्थापन करावे, त्याचप्रमाणे नवजात अतिदक्षता विभागातील बेड्सची संख्या वाढवावी, अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ऍडल्ट आयसीयूमधील बेड्सपैकी 50 टक्के खाटा नवजात अतिदक्षता वापरासाठी रुपांतरीत केल्या पाहिजेत, असेही समितीने सूचविले आहे, अशी माहिती गोमेकॉतील वरिष्ठ डॉक्टर जगदीश काकोडकर यांनी दिली. या समितीने तिसऱया लाटेदरम्यान मुलांसाठी दिल्या जाणाऱया उपचार नियमावलीवरही चर्चा केली. एम्सने (ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स) निर्धारित केलेल्या उपचार नियमावलीचे गोव्यातही पालन करण्यात येईल, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.