प्रतिनिधी /बेळगाव
मनपा महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने त्यांची अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी प्रशांत हणगंडी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र केएटी लवादाकडे याचिका दाखल करून बदलीला स्थगिती घेतली होती. पण स्थगिती हटविण्यात आली असून प्रशांत हणगंडी यांनी शुक्रवारी महापालिकेत हजेरी लावली आहे.
महापालिका महसूल उपायुक्तांच्या कारभाराविरोधात मागील काही महिन्यापासून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. अनेक फाईल मंजुरीविना रखडल्या आहेत. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱयांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. तसेच महसूल उपायुक्तांच्या विरोधात मनपाच्या कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन छेडले होते. महापालिका कार्यालयातील वरि÷ अधिकाऱयातील वादामुळे नागरिकांची कामे रखडली होती. त्यामुळे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांची बदली अन्यत्र करून त्यांच्या जागी यादगीर जिल्हय़ातील विभागाधिकारी प्रशांत हणगंडी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र या बदलीला आक्षेप घेऊन एस. बी. दोड्डगौडर यांनी केएटी लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यामुळे केएटी लवादाने बदली प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे एस. बी. दोड्डगौडर हे महापालिकेत पुन्हा रूजु झाले होते. रूजू होऊन देखील कामकाजात कोणताच फरक झाला नाही. नागरिकांची कामे जैसेथे आहेत. पण केएटी लवादाने याचिका फेटाळली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्थगिती हटली असून, प्रशांत हणगंडी हे शुक्रवारी मनपा कार्यालयात पुन्हा रूजू झाले आहेत. अधिकृत आदेश आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.