पंधरा दिवसांपासून पुकारलेला संप बुधवारी सायंकाळी तूर्तास मागे : सर्वसामान्य प्रवाशांतून समाधान व्यक्त
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी मागील पंधरा दिवसांपासून पुकारलेला संप बुधवारी सायंकाळी अखेर तूर्तास मागे घेतला. त्यामुळे बससेवा विविध मार्गांवर पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, गुरुवारपासून स्थानिकसह लांब पल्ल्यासाठी विविध मार्गांवर बस धावणार आहेत. मात्र, प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करावा लागणार आहे.
पंधरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले. दरम्यान, उच्च न्यायालयाने संप तातडीने मागे घेऊन बससेवा सुरळीत करा, अशा सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी बेळगाव बसस्थानकातून विविध मार्गांवर बस धावल्या. शहरासह ग्रामीण भागातही बससेवा पूर्ववत सुरू झाली.
परिवहनच्या कर्मचाऱयांनी सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भावही पुन्हा वाढल्याने परिवहन कर्मचाऱयांच्या संपामध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून बससेवा तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विविध भागात बससेवा सुरळीत सुरू झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी जेलभरोचा इशारा दिला होता. मात्र, याला थंडा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, संपाची तीव्रता आणखी वाढणार असे वाटत असताना उच्च न्यायालयाने बससेवा सुरळीत करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर बेळगाव बसस्थानकातून स्थानिक व लांब पल्ल्यासाठी विविध मार्गांवर बससेवा सुरू झाली. अनगोळ, खानापूर, रामतीर्थनगर, वडगाव, बी. के. कंग्राळी, सुळेभावी, देवराज अर्स कॉलनी, संतिबस्तवाड, हंगरगा, चंदगड, आरसीयू यासह हुबळी, धारवाड, निपाणी, कोल्हापूर आदी बस धावल्या. इतर आगारांतून बेळगाव-संकेश्वर, इचलकरंजी-उळवी, कोल्हापूर-दांडेली बस आगारात आल्या.
नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यूतही लांब पल्ल्याच्या बस धावणार
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. बुधवारपासून सोमवार ते शुक्रवार नाईट कर्फ्यू आणि शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. मात्र, या कालावधीत बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बस धावणार आहेत. स्थानिक बस बंद ठेवल्या जाणार आहेत.