राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा व्यवस्थापनाला इशारा : कामावरून काढून टाकल्याने राष्ट्रवादी आक्रमक
प्रतिनिधी / रत्नागिरी
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पायाभरणीपासून असलेल्या स्थानिक कामगारांना अचानक तेथील प्रशासनाने काढून टाकले आहे. त्या कामगारांना परत कामावर घ्यावे, अन्यथा या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेटय़े आणि राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव बंटी वणजू यांनी काढलेल्या स्थानिक कामगारवर्गाला घेऊन अणुऊर्जा कार्यालयातील मुख्य मदनगिरी आणि चव्हाण यांची भेट घेतली. कोणतीही सूचना न देता नोकरीवरून काढलेल्या कामगारांना ताबडतोब कामावर पुन्हा रुजू करून घ्या. अन्यथा अणुऊर्जा कार्यालयाला टाळे लावणार, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. अणुऊर्जा प्रशासनानेही या चर्चेवर सकारात्मक भूमिका घेत काढलेल्या स्थानिक कामगारांना पुन्हा घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी अन्यायग्रस्त स्थानिक कामगारवर्गांसह राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष साईजित शिवलकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष पप्पू तोडणकर, रुपेश आडिवरेकर, संकेत मुळ्ये, मिलिंद माळवदे, सुरज शेटय़े, सप्रे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.