प्रतिनिधी/ सातारा
स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी मोगराळे घाट ता. माण येथून 8 किलो 084 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर माल असा एकून 9 लाख 84 हजार 680 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी लक्ष्मण रामु जाधव, रणजित लक्ष्मण जाधव (वय 24 दोघे रा. पिलीव ता. माळशिरस) यांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गंभीर गुह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा शनिवार दि. 4 रोजी मोगराळे घाट ता. माण येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीनूसार संशयिताना पकडण्यासाठी पथक तयार केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व पोलीस अंमलदार यांना सोबत घेवून मोगराळे घाट नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी सुरू केली. येथे स्विफ्ट डिझायर कार (क्रं एम.एच-45/ए.डी-5110) आल्यानंतर कारची तपासणी करताना कारमधून उग्र वास आल्याने कारमध्ये गांजा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे दहिवडी विभाग कॅम्पचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित लक्ष्मण रामु जाधव, रणजित लक्ष्मण जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 680 रूपये किंमतीचा एकून 8 किलो 084 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम व पांढऱया रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी व दोन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल असा एकून 9 लाख 84 हजार 680 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस हवालदार साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधणे, पोलीस नाईक अर्जुन शिरतोडे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्निल माने, गणेश कापरे, मोसीन मोमीन, मयुर देशमुख, पोलीस कॉन्टेबल सचिन ससाणे, वैभव सावंत, प्रविण पवार, चालक पोलीस हवालदार शिवाजी गुरव, दहिवडी उपविभागीय कार्यालयातील पोलीस नाईक राम तांबे, पोलीस उपनिरीक्षक तुपे, पोलीस हवालदार हांगे, पोलीस कॉन्टेबल वाघमारे यांनी सहभाग घेतला.