नगरसेवकांना 30 लाखांचा निधी; दिवंगत नेत्यांच्या स्मारकांसाठी तरतूद; मनपा शाळा ‘हायटेक’ करण्यावर भर
सांगली प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेचे सन 2022-23 चे 742 कोटी 99 लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी बुधवारी विशेष अर्थसंकल्पीय सभेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले. प्रशासनाच्या अंदाजपत्रकामध्ये 50 कोटींची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये नगरसेवकांना बायनेम वैशिष्टय़पूर्ण कामांसह विविध विकासकामांसाठी 30 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते राजारामबापू पाटील, डॉ. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकासह स्व. वसंतरावदादा पाटील यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यासाठी भरीव तरतूदही अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान भाजप, काँगेस व राष्ट्रवादीच्या गटनेते, तसेच मनपा आयुक्त व प्रमुख नगरसेवकांची याबाबत एकत्रित बैठक घेऊ. सदस्यांनी येत्या 10 एप्रिलपर्यंत सूचना, विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. त्यांचा समावेश करून येत्या 15 एप्रिल रोजी अंदाजपत्रक अंतिम केले जाईल, अशी घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सभागृहात केली.
नगरसेवकांना 30 लाखांचा निधी
दरम्यान महापालिकेच्या शाळा व आरोग्य केंद्रे ’हायटेक’ करण्यावर सभापती आवटी यांनी भर दिला आहे. शाळा व आरोग्य केंद्रामध्ये इंटरनेट सेवेसाठी 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय एक अथवा दोन मुली झाल्यानंतर दाम्पत्याने ऑपरेशन केल्यास मुलींच्या नावावर सिंधुताई सपकाळ कन्या योजनेंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आवटी यांनी दिली. यापुढच्या काळातही तिन्ही शहरांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आवटी म्हणाले, प्रशासनाच्या अंदाजपत्रकामध्ये 50 कोटींची वाढ केली आहे. नगरसेवकांना वैशिष्टय़पूर्ण कामांसह विविध विकासकामांसाठी 30 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
गणेश तलावांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक
महापालिका शाळातील 5 वी पास व 60 टक्केच्यावर गुण असणाऱया विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले प्रोत्साहन बक्षीस योजनेतून सायकल वाटप करण्यात येईल. यासाठी 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आशा कर्मचाऱयांना सायकल वाटप 15 लाख, मिरजेत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी 10 लाख, तिन्ही शहरात ट्रीमिक्स पद्धतीने रस्त्यांसाठी अडीच कोटी, चौक सुशोभीकरण 27 लाख, मिरज येथील गणेश तलावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे व शिल्प व सुशोभिकरणासाठी 50 लाख, तिन्ही शहरात जलतरण विकसित करणे 50 लाख, व्यापारी संकुल विकसित करणे 1 कोटी, कुपवाड येथे स्व. मदनभाऊ पाटील क्रीडांगणासाठी 35 लाख, मिरज येथे गांधी चौकात तिरंगा झेंडा लावण्यासाठी 30 मीटर उंच पोल उभा करण्यासाठी 50 लाख, संभाजी महाराज शौर्य क्रीडा स्पर्धेसाठी 10 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यापुढील काळात कुपवाड ड्रेनेज योजना, शेरीनाला प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीचे काम सुरू करण्यासह अन्य महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आवटी यांनी सांगितले. तत्पूर्वी आवटी यांनी इलेक्ट्रिक बाईकवरुन महापालिकेत एंट्री केली. पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
घरपट्टी, पाणीपट्टीचे बिल आता एकत्र
नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षातून दोन वेळा बिले दिली जातील. तसेच पाणीपट्टीतील तूट भरून काढण्यासाठी ज्या मालमत्ताधारकांनी नळ कनेक्शन जोडले नाही, अशा मालमत्ताधारकांना प्रत्येकी दोन महिन्याला 320 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात पी.पी.पी. तत्वावर पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेण्यता आला असल्याचे सभापती आवटी यांनी सांगितले.
तर टॉवर, जाहिरातीचा कर मालमत्ताकरातून
महापालिका क्षेत्रातील अनेक मोबाईल टॉवर व जाहिरातीचे कर थकीत आहेत. कर वसुलीमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात. हे लक्षात घेत आता मोबाईल टॉवर किंवा जाहिरात फलकासाठी परवानगी देताना मूळ मालकाच्या नावाने द्यायची. कर थकीत राहिल्यास संबंधित मालकाच्या मालमत्ताकरातून वसूल करावा असा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय तिन्ही शहरात फूड झोन तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.