प्रतिनिधी / नागठाणे :
विकेंड लॉकडाऊन असतानाही आदेशाचा भंग करत स्नॅक्स सेंटर सुरू ठेवल्याप्रकरणी माजगाव फाटा ( ता.सातारा) येथील सेंटर मालकावर बोरगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्याचाकडून 10 हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला. महामार्गावरील साई स्नॅक्स सेंटरवर ही कारवाई करण्यात आली.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असताना रविवारी सकाळी बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर, हवालदार किरण निकम व मनोहर सुर्वे यांना महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना माजगाव फाटा येथील साई स्नॅक्स सेंटर सुरू असल्याचे व तेथे प्रवाशी नास्ता करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी साई स्नॅक्स सेंटरचे चालक निलेश लक्ष्मण घोरपडे (वय.३०,रा.निसराळे,ता.सातारा) याच्यावर विकेंड लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करत 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला.