प्रतिनिधी /निपाणी
येथील भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील शिक्षिका स्नेहल ज्योतिबा पाटील यांना बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मराठी विषयातील पीएच. डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी ’डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या साहित्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावरील प्रबंध प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागात प्रा. डॉ. नेसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारंभात स्नेहल पाटील यांना ही पदवी देण्यात आली. यावेळी धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. यशवंत राऊत हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद गायकवाड, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी प्रबंधावर विचार व्यक्त केले. आभार प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी मानले. डॉ. स्नेहल पाटील यांचे प्राथमिक शिक्षण कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळा तर माध्यमिक शिक्षण मार्केंडेय हायस्कूल कंग्राळी येथून झाले. उच्च माध्यमिक शिक्षण बेळगावमधील ज्योती ज्युनियर कॉलेज येथून आणि महाविद्यालयीन शिक्षण राणी पार्वतीदेवी महाविद्यालय येथून झाले. धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी एम. ए. पदवी पूर्ण केली. सध्या त्या निपाणीतील भागीरथीबाई शाह कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दि फीमेल एज्युकेशन सोसायटी निपाणीचे चेअरमन आशिषभाई किरणभाई शाह व व्हा. चेअरमन प्रसन्नकुमार संतकुमार गुजर, पती अकोळमधील पार्श्वमती कन्या विद्यालयातील शिक्षक ज्योतिबा पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.