वार्ताहर /अकोळ :
स्नेहसंमेलन म्हणजे मुलींच्या अंगी असणाऱया विविध कलागुणांना वाव मिळवून देण्याचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही. के. गावडे यांनी केले. येथील मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी हेमंत भारमल यांच्या हस्ते व्यासपीठाचे पूजन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गणेशवंदन गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमात मोबाईल संस्कृती नाटिका, कथा, विविध वेशभूषांचे मुलींनी उत्कृष्ट सादरीकरण केले. याशिवाय मराठमोळय़ा लावणी गीत, कोळी नृत्य, टीपरी नृत्य, देशभक्तीपर गीतांसह हिंदी, मराठी, कन्नड गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
नृत्याविष्काराला रसिकांची दाद
संमेलनाच्या माध्यमातून मुलींनी नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. आकर्षक विद्युत रोषणाई, नृत्य गीतांना साजेसा पेहराव यामुळे व्यासपीठालाही उठावदारपणा आला होता. मुलींनी सादर केलेल्या नृत्यांना उपस्थित पालकांसह रसिकांनी टाळय़ांच्या गजरात दाद दिली. तर बऱयाच हौशी रसिकांनी रोख रकमेच्या माध्यमातून बक्षिसे देऊन मुलींना प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, शिक्षक, शिक्षिका, महिला व पुरुष, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. डी. शिंदे, जे. एन. चव्हाण यांनी तर डी. टी. केसरकर यांनी आभार मानले.