हिमाचल प्रदेशात पंधरा दिवस करणार बर्फातून धावण्याचा सराव, 26 मार्चला स्पर्धा
संग्राम काटकर/ कोल्हापूर
आंर्टाटिकासह युरोप राष्ट्रांमध्ये होणारी स्नो-मॅरेथॉन स्पर्धा आता प्रथमच भारतातील लाहौलमध्ये (हिमाचल प्रदेश) 26 मार्चला होत आहे. स्टार्ट टू एंड बर्फच बर्फ शिवाय जितका चढ, तितकाच उतार असा 42 किलोमीटरचा खडतर मार्ग या मॅरेथॉनसाठी नियोजित केला आहे. मार्गातील तापमानही उणे 8 ते 12 अंश सेल्सिअस असणार आहे. अशा या आव्हानात्मक वातावरणात होणाऱया स्नो-मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरचा धावपटू विशाल गुडूळकर हा पूर्ण ताकदीने उतरत आहे. स्पर्धेच्या तयारीचा भाग त्याने गेली काही महिने श्वसनाशी संबंधित योगांसह प्राणायम केले आहे. आता बर्फ व कमी तापमानाशी शरीर मिळते-जुळते करत बर्फातून धावण्याचा सरावासाठी विशाल हा लवकरच लाहौलकडे जाणार आहे.
रिच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्नो-मॅरेथॉनचे आयोजन करताना देशभरातील इतर धावपटूंसोबत कोल्हापूरच्या विशाललाही स्पर्धेचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर केले आहे. त्याला ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून निवडताना 2018 सालच्या अल्ट्रा रनमध्ये व 2019 सालच्या स्टेडियम रनमध्ये केलेल्या दमदार धावची दखल घेतली. ब्रॅण्ड ऍम्बेसिडरने केल्याने विशालची मॅरेथॉनमध्ये चांगली कामगिरी करण्याची जबाबदारीही वाढली आहे. मॅरेथॉनमध्ये विशालसोबत देशातील कित्येक स्पर्धकही असणार आहे. त्यांना बर्फातून मॅरेथॉन करताना उणे 8 ते 10 अंश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजनची कमरतता अशा आव्हानाशी झुंजत मॅरेथॉनचे 42 किलोमीटरचे आंतर पूर्ण करायचे आहे.
मॅरेथॉनचे आव्हान पेलण्यासाठी विशालने रोज श्वसनाशी संबंधीत योगांसह प्राणायम करत स्वतला मानसिकदृष्टय़ा सक्षम केले आहे. आता तो शारीरिकदृष्टया सक्षम होण्यासाठी लाहौलला जाणार आहे. तेथे गेल्यानंतर वॉटरफ्रुप जॅकेट, बॉडी वार्मर कॅप व पॅन्ट, ट्रकसुट, पायात दोन किंवा तीन सॉक्स आणि तळव्याला खिळे असलेला बुट असा किट तो बर्फाळ भागात धावण्याचा सराव करणार आहे. तीन-चार तास धावण्याचा सराव झाला की तो काही तास बर्फात बसून श्वसनाशी संबंधित योगाही करणार आहे. सोबत तो स्नो-मॅरेथॉनशी संबंधीत असलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. या कॅम्पमधून मॅरेथॉन करताना स्वतला तंदुरुस्त कसे ठेवायवे, बर्फात कसे चालायचे अन् धावायचे, धावताना श्वास कसा घ्यायचा-सोडायचा, धावण्याचा वेग कसा वाढवायचा हे शिकणार आहे. शिकल्याप्रमाणे स्पर्धेचे 42 किलो मीटरचे अंतर कसे पूर्ण करायचे याचा ठोकताळा तयार करुन तो बर्फातून धावण्याचा सराव करुन 26 मार्चला होणाऱ्या आहे.
स्नो-मॅरेथॉन एक चॅलेंजच…
स्नो-मॅरेथॉनचा थरार काय असतो, याबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यामुळे या स्पर्धेत कितपत यश मिळेल याचं ही थोड दडपण आहे. पण एक चॅलेंज म्हणून मी स्नो-मॅरेथॉनकडे पाहत आहे. आजवर मी देशभरातील 25 मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. या मॅरेथॉनमधून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्नो-मॅरेथॉनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
विशाल गुडूळकर (राष्ट्रीय धावपटू)