वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारी संकटामुळे जुलै महिन्यात येथे होणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी यापूर्वी घेतला आहे. दरम्यान, या स्पर्धेत ठेवण्यात आलेली एकूण 12.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रक्कम आता 620 टेनिसपटूंमध्ये वाटण्यात येणार असल्याची माहिती अखिल इंग्लंड टेनिस क्लबच्या प्रवक्त्याने शुक्रवारी दिली.
सदर स्पर्धेच्या आयोजकांनी संबंधित विमा खात्याच्या अधिकाऱयांशी चर्चा करूनच वरील निर्णय घेतला आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला विभागात प्रमुख ड्रॉ मध्ये एकूण 256 टेनिसपटू सहभागी होत असतात. प्रमुख ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक टेनिसपटूला आता 25 हजार पौंड्स (31 हजार डॉलर्स) दिले जाणार आहेत. तर उर्वरित 224 टेनिसपटूंना प्रत्येकी 12 हजार 500 पौंड्स (15 हजार 600 डॉलर्स) रक्कम मिळणार आहे.
प्रमुख ड्रॉ साठी पात्र फेरीमध्ये हे 224 टेनिसपटू सहभागी होत असतात. कोरोना संकटामुळे सदर स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्पर्धा आयोजकांनी विम्बल्डन स्पर्धेला मदत करणाऱया व्यक्तींना या स्पर्धेकडून हातभार लागावा या हेतूने बक्षिसाची रक्कम स्पर्धा रद्द होऊनही टेनिसपटूंमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अखिल इंग्लंड टेनिस क्लबचे प्रमुख कार्यकारी रिचर्ड लेविस यांनी दिली.
सदर स्पर्धेच्या दुहेरीत भाग घेणाऱया सुमारे 120 टेनिसपटूंना प्रत्येकी 6 हजार 250 पौंड्स (7 हजार 800 डॉलर्स) त्याचप्रमाणे व्हिलचेअर टेनिस प्रकारात भाग घेणाऱया 16 टेनिसपटूंना प्रत्येकी 6 हजार पौंड्स (7 हजार 500 डॉलर्स), क्वेड व्हिलचेअर प्रकारात भाग घेणाऱया 4 टेनिसपटूंना प्रत्येकी 5 हजार पौंड्स (6 हजार 200 डॉलर्स) दिले जातील. 1945 नंतर प्रथमच या स्पर्धेच्या इतिहासामध्ये 2020 ची विम्बल्डन स्पर्धा आयोजकांना कोरोना महामारी संकटामुळे रद्द करावी लागली.