कोणतीही स्पर्धा असो अथवा सामने त्याचा कणा हा पंच असतो. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकूण संलग्न 45 जिल्हा व शहर तालीम संघ सहभागी होत असतात. प्रत्येक संघात माती व गादी गटात एकूण 20 खेळाडू, 2 कोच व एक टिम मॅनेजर असे एकूण 1035 जण सहभागी होतात. या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून एकूण 125 पंच सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे – 04, प्रथम श्रेणी. राष्ट्रीय स्तर ए ग्रेड- 40, विभाग राज्यस्तर बी. ग्रेड- 45, सर्वसामान्य सी. ग्रेड- 25, रेकॉर्डर म्हणून 11 असे श्रेणी निहाय पंच काम करत असतात, असे कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव प्रा. डॉ. बंकट यादव यांनी सांगितले.
बंकट म्हणाले, या स्पर्धेत एकूण 5 आखाडे असून प्रत्येक आखाडय़ावर (माती/मॅट) साधारणत: 20 ते 25 पंचाची नियुक्ती करण्यात येते. प्रत्येक आखाडय़ावर पंचाचा संघ हा परिपूर्ण ठेवला जातो. प्रत्येक आखाडय़ावर प्रमुख दोन पंचाची नियुक्ती केली जाते. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचाला प्राधान्य देण्यात येते. हे दोन पंच अनुभवी व तज्ञ असतात. त्यांच्या ग्रुपमधील पंचाचे ते नियोजन करतात. कुस्तीला आखाडाप्रमुख कोणाला पाठवायचे/ कोणाला सरपंच/कोणाला साईड पंच पाठवायचे हे दोन पंच ठरवून त्या पध्दतीने पंच पाठवित असतात.
पंचाच्या निर्णयात असहमती किंवा प्रोटेस्ट आल्यास तीन जनांची ज्युरी ऑफ अपिल कमिटी असते. लढतीचा व्हिडिओ पाहून ज्युरी ऑफ अपिल निर्णय देत असतात.
स्पर्धा योग्य सुरळीत पार पाडण्यासाठी दररोज सकाळी स्पर्धेपूर्वी पंच उजळणी वर्ग/नवीन नियमाची माहिती प्रत्येक पंचाला दिली जाते. नवीन बदल (ळें) ने केल्यास त्याची अंमलबजावणी स्पर्धेत केली जाते. स्पर्धेत दररोज पंचाची हजेरी होते. व पंचाना शिस्तीबद्दल माहिती दिली जाते. न्यायदान करताना काही चुका झाल्यास त्यांची दुरुस्ती व प्रेरणा देण्यात येते. एखाद्या महत्त्वाच्या कुस्तीसाठी पंच नियुक्ती तांत्रिक कमिटी करुन देत असतो. ज्या जिल्हय़ाचा खेळाडू स्पर्धेत खेळत आहे त्या जिल्हय़ाचा पंच न्यायदानासाठी उपस्थित राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाते. सर्व पंचावर नियंत्रण करण्यासाठी तांत्रिक सचिव इतर तज्ञ लोक मिळून तांत्रिक समिती निर्मिती परिषदेमार्फत केली जाते. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमार्फत विभागनिहाय पंच परीक्षेचे आयोजन केले जाते. सर्व जिल्हय़ातील पंचाचा सहभाग त्यात असतो. व पंच परीक्षा पास पंचाना (ळें) ने ठरविलेल्या गणवेशात परिषदेच्या विविध स्पर्धेत नियुक्ती दिली जाते.