महापौर-उपमहापौर निवडणुकीची मनपाकडून तयारी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर-उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिले असल्याचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत महापालिका कार्यालयात अधिकृत पत्र आले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. समाज माध्यमांवरील पत्राच्याआधारे महापालिकेने महापौर-उपमहापौर निवडणुकीची तयारी चालविली आहे. मात्र मनपा प्रशासनाला अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे.
महापौर-उपमहापौर आरक्षणाच्या मुद्दय़ामुळे निवडणूक रखडली होती. मात्र नगरविकास खात्याने आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिले असून 21 व्या कार्यकालावधीच्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची सूचना पत्राद्वारे नगरविकास खात्याने केली आहे. याबाबतचे पत्र हुबळी-धारवाड आणि बेळगाव महापालिकेला देण्यात आले आहे. स्पष्टीकरणाबाबतचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. पण महापालिका कार्यालयाला अधिकृत पत्र मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीची तयारी कशी करायची? असा प्रश्न मनपाच्या कौन्सिल विभागासमोर निर्माण झाला होता. याबाबत आयुक्त रुदेश घाळी यांच्यासमवेत चर्चा केली असता, समाज माध्यमांवरील पत्राच्या प्रतीद्वारे तयारी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या कौन्सिल विभागाने समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या पत्राद्वारे महापौर-उपमहापौर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
महापौर-उपमहापौर निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने याबाबत प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठविण्यात येणार असून याची तयारी मनपाने केली आहे. महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी कोरोनाबाधित झाल्याने कार्यालयात आले नव्हते. मात्र सोमवारी आयुक्त रूजू झाल्याने प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीची तयारी केली असली, तरी आरक्षणाच्या स्पष्टीकरणाबाबतच्या अधिकृत पत्राची प्रतीक्षा महापालिकेला आहे.