वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हवाई क्षेत्रात कार्यरत कंपनी स्पाईसजेट एव्हेन्यु कॅपिटलच्या मदतीने 50 नवी विमाने येणाऱया काळात खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते. हवाई वाहतूक कंपनी स्पाईस जेटने या संदर्भात न्यूयॉर्कमधील कंपनी एव्हेन्यु कॅपिटलबरोबर सहकार्याचा करार (एमओयू) नुकताच केला आहे.
या अंतर्गत वित्तसहाय्य, अधिग्रहण, विक्री आणि भाडेतत्त्वावर 50 नवी विमाने घेतली जाणार आहेत. स्पाईस जेटच्या ताफ्यामध्ये सदरची नवी विमाने दाखल होणार असून यांचा वापर देशांतर्गत विमान वाहतुकीकरिता केला जाणार आहे. एव्हेन्यु कॅपिटल ग्रुप ही विमाने भाडेतत्त्वावर देण्यामध्ये व नवी विमाने उपलब्ध करण्यामध्ये मोठी कंपनी समजली जाते.
स्पाईस जेटने एव्हेन्यु कॅपिटल ग्रुपबरोबर विमान खरेदीसंदर्भात नवे धोरण अवलंबिले आहे. या भागीदारीचा आपल्याला खूप फायदा येणाऱया काळामध्ये होणार असल्याचे स्पाईस जेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरमन अजय सिंग यांनी सांगितले. भारतातील विविध मार्गांवर विमानसेवा जास्तीतजास्त शहरांपर्यंत देण्यासाठी नव्या खरेदी केलेल्या विमानांची मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दीर्घ काळासाठी ही भागीदारी स्पाईसजेटच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.