दुसऱया कसोटीत वॉर्नरच्या जागी हेडला संधी मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहिल्या कसोटीत भारताकडून दणदणीत पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघात काही बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे स्थान धोक्यात आले असून त्याच्या जागी ऑफस्पिन अष्टपैलू ट्रव्हिस हेडला संघात स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे. त्याचप्रमाणे मॅट कुहनमन या स्पिनरला तातडीने भारताकडे पाठविण्यात आले आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरी कसोटी नवी दिल्लीत 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
नागपूर कसोटीत निराशाजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने झटपट कृतीला सुरुवात केली असून स्पिनर मॅट कुहनमनला उर्वरित मालिकेत सामील होण्यासाठी ताबडतोब भारतात पाठवले आहे. येत्या शुक्रवारी सुरू होणाऱया दुसऱया कसोटीसाठी कुहनमनला पदार्पणाची संधी मिळू शकते. तसा विचार संघव्यवस्थापन करीत आहे. हा डावखुरा स्पिनर लेगस्पिनर मिचेल स्वेप्सनच्या जागी खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन व्यवस्थापन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी हेडला खेळविण्याचा त्यांचा विचार आहे. वॉर्नरला पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत मिळून केवळ 11 धावा जमविता आल्या. आजवर 102 कसोटी खेळलेल्या अनुभवी वॉर्नरने 45.74 च्या सरसरीने 8143 धावा जमविल्या आहेत. त्यात 25 शतकांचा समावेश आहे. मात्र भारतातील त्याचा परफॉर्मन्स एकदम साधारण राहिला आहे. 9 सामन्यात तेन 399 धावा 22.16 च्या स्ट्राईक रेटने जमविल्या असून 71 ही त्याची भारतातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
पहिल्या कसोटीत आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांनी आपल्या फिरकीवर 20 पैकी 15 बळी नोंदवले. यावरून भारताकडे सध्या कोणत्या दर्जाचा फिरकी मारा आहे, हे लक्षात येण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलरना वाटते की वॉर्नरला किमान आणखी एक संधी दिली जावी. तो बऱयाच काळापासून खेळतोय आणि त्याला बऱयापैकी संधी देण्यात आलीय, हेही खरंय. तरीही त्याला आणखी एक संधी दिली जावी. चूक सुधारण्याची त्याला संधी मिळायला हवी, असे मला वाटते, असे त्यांनी म्हटल्याचे सिडनी मॉर्निंग हेराल्डने वृत्त दिले आहे.
‘या सामन्यात असे दिसून आले की वॉर्नर व उस्मान ख्वाजा आघाडीवर खेळतात तेव्हा त्यांना रवि अश्विनला नव्या चेंडूवर सामोरे जावे लागते आणि चार षटकानंतर जडेजाशी त्यांना मुकाबला करावा लागतो. म्हणजेच तुम्ही कुठेही खेळा, याच गोलंदाजांना तुम्हाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आघाडीच्या या दोघांना कायम ठेवले जावे, असे मला वाटते,’ असेही टेलरने म्हटले आहे.