वृत्तसंस्था /मॉस्को :
रशियात ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साईड इफेक्ट आढळून आल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी दिली. अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साईड इफेक्टचे स्वरुप होते. ‘द मॉस्को टाईम्स’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लसीचे पहिल्या दोन टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर साईड इफेक्ट आढळून आले नाहीत. तसेच सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली, असे लॅन्सेटच्या अहवालामध्ये म्हटले होते.