ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला आता आणखी एका लसीचं बळ मिळालं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतात सिंगल डोस स्पुतनिक लाईटच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात मंजुरी मिळालेली ही 9 वी कोरोना लस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी स्पुतनिक लाईटच्या आपत्कालीन वापराबाबत माहिती दिली.
मांडविया यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘डीसीजीआयने ने भारतात सिंगल डोस स्पुतनिक लाईट कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. कोरोनाविरुद्ध देशात राबविण्यात येणारी ही 9 वी लस आहे. यामुळे महामारीशी लढण्यासाठी देशाच्या सामूहिक प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.
स्पुटनिक लाईट या रशियन लसीचा देशभरात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्पुतनिक लाईटचा एकच डोस कोरोनाविरूद्ध 93.5 टक्के प्रभावी आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून देखील खूप प्रभावी आहे.