ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ ही लस भारतीय मैदानात उतरली आहे. मे अखेर या लसीचे भारतात 30 लाख डोस तर जूनअखेर 50 लाख डोस आयात होतील. तर ऑगस्टपासून या लसीचे उत्पादन भारतातच होऊ शकते, असे रशियातील भारताचे राजदूत डी. बाला व्यंकटेश वर्मा यांनी म्हटले आहे.
भारतात आपत्कालीन वापरास मंजूरी मिळालेली ‘स्पुतनिक -व्ही’ ही तिसरी लस आहे. सध्या हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीकडून या लसीची आयात केली जाते. याच कंपनीकडून या लसीचे भारतात उत्पादन करण्यात येणार आहे. सध्या ही लस प्रति डोस 995.40 रुपयांना मिळत आहे. भारतात उत्पादनाला सुरुवात झाल्यास देशात मोठय़ा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतील. त्यामुळे या लसीची किंमतही कमी होऊ शकते.
तर केवळ एकच डोस घ्यावा लागणाऱ्या ‘स्पुतनिक लाइट’ या लसीसाठीही भारताने रशियाला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही.