आफ्रिकेतील देशाने वापरावर घातली बंदी
वृत्तसंस्था / विंडहोक
नामीबिया या आफ्रिकेतील देशाने रशियात निर्मित कोरोनाविरोधी लस स्पुतनिक-5 च्या वापराला स्थगिती दिली आहे. शेजारी देश दक्षिण आफ्रिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आल्यावर नामीबियाने हे पाऊल उचले आहे. स्पुतनिक-5 लस घेणाऱया पुरुषांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढत असल्याचे मानले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयानंतर आमच्या सरकारने देखील तत्काळ प्रभावाने याच्या वापरावल बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी अनुमती मिळत नाही तोवर ही बंदी राहणार असल्याचे नामीबियच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
स्पुतनिक-5 लस विकसित करणाऱया गामलेया रिसर्च इन्स्टीटय़ूटने या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नामीबियाचा निर्णय कुठल्याही वैज्ञानिक पुरावा किंवा संशोधनावर आधारित नसल्याचे रशियाच्या संस्थेकडून म्हटले गेले.
आमच्या देशात स्पुतनिक-5च्या आपत्कालीन वापराला मंजुरी देणार नाही. काही संशोधनांमधून स्पुतनिक-5 मध्ये एडेनोव्हायरस टाइप 5 वेक्टर असल्याचे आढळून आले असून याच्या वापरामुळे पुरुषांमध्ये एचआयव्ही होण्याची भीती वाढत असल्याचे दक्षिण आफ्रिकेतील नियामक एएएचपीआरएने म्हटले आहे.
भारतातही स्पुतनिक-5 लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. पण आतापर्यंत अशी कुठलीच भीती समोर आलेली नाही. भारतात या लसीचा वापर तसे पाहिल्यास खूपच कमी प्रमाणात झालेला आहे.