नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून दोन दिवसांच्या 4 जी स्पेक्ट्रमचा लिलाव मंगळवारी समाप्त झाला. चालू लिलावामध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावत सर्वात मोठा स्पेक्ट्रम प्राप्त केला आहे. दूरसंचार मंत्रालयाने यासंदर्भात अधिकची माहिती दिली आहे.
संपूर्ण दोन दिवसांच्या दूरसंचार कंपन्यांच्या लिलावामध्ये 77,814.80 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमची खरेदी केली आहे. सोमवारी 2,250 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु केला होता. यातील आरक्षित मूल्य जवळपास चार लाख कोटी रुपये होते. दूरसंचार सचिव अंशु प्रकाश यांनी म्हटल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये झालेल्या लिलावादरम्यान 77,814.80 कोटी रुपयांच्या 855.60 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची खरेदी करण्यात आली आहे.
परंतु 700 ते 2500 एमएचझेड बँडमध्ये कोणतीही बोली आलेली नाही. लिलावामध्ये सादर करण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रममध्ये 700 मेगाहर्ट्जमध्ये बँड स्पेक्ट्रमचा हिस्सा हा एक तृतीयांश राहिला आहे.
एअरटेलची बोली
दूरसंचार क्षेत्रातील खासगी कंपनी भारती एअरटेलने स्पेक्ट्रमचा लिलाव हा 18,699 कोटी रुपयांसह प्राप्त केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने 355.45 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम, मिड बँड आणि 2300 मेगाहर्ट्ज ब्रँडचे अधिग्रहण केले आहे.
रिलायन्स जिओला प्राप्त झालेला स्पेक्ट्रम
दोन दिवस सुरु असलेला स्पेक्ट्रम लिलाव अखेर समाप्त झाला आहे. यामध्ये रिलायन्स जिओने सर्व 22 सर्कलमध्ये खरेदी केली आहे. रिलायन्सकडून एकूण 57,123 कोटी रुपयाची खरेदी झाली आहे. या खरेदीनंतर रिलायन्स जिओजवळ 1,717 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम होणार असून जो अगोदरच्या तुलनेत 55 टक्क्यांनी अधिक आहे.