एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नवोदित पाब्लो अँडय़ुजेरने स्वीसच्या दोन टेनिसपटूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत त्याने यापूर्वी स्वीसच्या अनुभवी रॉजर फेडररचा तर त्यानंतर गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीसच्या नवोदित डॉम्निक स्ट्रिकेरचा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अँडय़ूजेरने स्वीसच्या 18 वर्षीय स्ट्रिकेरचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. अँडय़ूजेरचा पुढील फेरीतील सामना नॉर्वेच्या कास्पर रुडशी होणार आहे. 22 वर्षीय रुडने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या कोफेरवर 2-6, 6-1, 6-4 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. उरुग्वेच्या क्युवेसने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना बल्गेरियाच्या चौथ्या मानांकित डिमीट्रोव्हचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव केला.