वृत्तसंस्था / मियामी (अमेरिका)
स्पेनचा 18 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्काराझने रविवारी येथे एटीपी टूरवरील मियामी खुल्या मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना नॉर्वेच्या सहाव्या मानांकित कास्पर रूडचा पराभव केला.
स्पेनच्या अल्काराझचे एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतील हे पहिले विजेतेपद आहे. अल्काराझने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील हे तिसरे विजेतेपद मिळविले असून मियामी टेनिस स्पर्धेच्या 37 वर्षांच्या इतिहासात अल्काराझ हा सर्वात तरूण विजेता टेनिसपटू ठरला आहे. या जेतेपदामुळे एटीपीच्या ताज्या मानांकनात त्याने 11 व्या स्थानावर झेप घेतली आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अल्काराझने कास्पर रूडचा 7-5, 6-4 असा पराभव केला. मायकेल चँगने 1990 साली आपल्या वयाच्या 18 वर्षे आणि पाच महिने असताना टोरँटो स्पर्धा जिंकली होती तर स्पेनच्या राफेल नदालने 2005 साली माँटे कार्लो टेनिस स्पर्धा आपल्या वयाच्या 18 वर्षे 10 महिने असताना जिंकली होती.