वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथील कलिंगा स्टेडियमवर 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी खेळविल्या जाणाऱया प्रो लीग हॉकी स्पर्धेतील ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या यजमान भारताबरोबर दोन सामने खेळण्यासाठी स्पेन हॉकी संघाचे येथे आगमन झाले आहे.
प्रो लीग हॉकी स्पर्धेतील चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या सलामीच्या दोन्ही सामन्यात स्पेनला पराभव पत्करावा लागला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात नवव्या स्थानावरील स्पेनचा संघ 2022 च्या प्रो लीग हॉकी हंगामात आपला विजय नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि स्पेन यांच्यात 26 आणि 27 फेब्रुवारीला दोन सामने खेळविले जाणार आहेत. स्पेनचे नेतृत्व मार्क मिरालेसकडे सोपविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताने आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. भारत आणि स्पेन यांच्यातील हे आगामी सामने येत्या शनिवारी आणि रविवारी कलिंगा स्टेडियमवर खेळविले जाणार असून या सामन्यांना भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.