वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पेनची माजी महिला टेनिसपटू तसेच माजी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम विजेती कोंचिता मार्टिनेझला कोरोनाची बाधा झाली आहे. 48 वर्षीय मार्टिनेझ कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. दोहातील एका रूग्णालयात मार्टिनेझला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दोहामध्ये सोमवारपासून कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पेनची मार्टिनेझ मुगुरूझाची प्रशिक्षिका आहे. या स्पर्धेसाठी मुगुरूझासमवेत मार्टिनेझ दोहा येथे दाखल झाली होती. 1994 साली मार्टिनेझने विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविले. तसेच गेल्यावर्षी मार्टिनेझचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.