वृत्तसंस्था /ग्युडालेजेरा (मेक्सिको)
2021 टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत स्पेनच्या गार्बेनी मुगुरूझाने एकेरीचे जेतेपद मिळविताना इस्टोनियाच्या कोंटाव्हेटचा अंतिम सामन्यात पराभव केला. महिला दुहेरीत झेकच्या टॉप सीडेड जोडी बार्बोरा क्रेसिकोव्हा आणि कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी अजिंक्यपद पटकाविले.
बुधवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या सहाव्या मानांकित मुगुरूझाने इस्टोनियाच्या आठव्या मानांकित कोंटाव्हेटचा 6-3, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील मुगुरूझाचे एकेरीतील हे दहावे विजेतेपद आहे.
2015 साली झालेल्या या स्पर्धेत मुगुरूझाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेच्या इतिहासात एकेरीचे जेतेपद मिळविणारी मुगुरूझा ही दुसऱया क्रमांकाची वयस्कर टेनिसपटू ठरली आहे. 2014 साली या स्पर्धेत जेतेपद मिळविणारी अमेरिकेची सेरेना विल्यम्स ही सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू आहे.
महिला दुहेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात झेकच्या क्रेसिकोव्हा आणि सिनियाकोव्हा या जोडीने चीन तैपेईचा तृतीय मानांकित जोडी हेस सु वेई आणि बेल्जियमच्या इलेसी मर्टन्स यांचा 80 मिनिटाच्या कालावधीत 6-3, 6-4 असा पराभव करत जेतेपद पटकाविले. झेकच्या या जोडीचे वर्षअखेरीस खेळविल्या जाणाऱया अंतिम स्पर्धेतील हे पहिले जेतेपद आहे.