ऑलिम्पिकमध्ये क्लायम्बिंग इव्हेंटचा प्रथमच समावेश, अमेरिकेच्या कोलमनला रौप्य तर ऑस्ट्रियाच्या स्कुबर्टला कांस्य
स्पॅनिश टिनेजर ऍथलिट अल्बर्टो जिनेस लोपेझने स्पोर्ट क्लायम्बिंग या नव्या कम्बाईन्ड इव्हेंटमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला. 18 वर्षीय अल्बर्टोने स्पीडमध्ये विजय प्राप्त केला व नंतर बोल्डरिंगमध्ये चौथे, एकत्रित तालिकेत सातवे स्थान मिळवले. त्याने स्पीडमध्ये 30 गुण घेतले आणि नजीकचा अमेरिकन प्रतिस्पर्धी नॅथेनियल कोलमनला 2 गुणांनी पिछाडीवर टाकले. या सर्व प्रकारातील एकत्रित तालिकेत लोपेझची आघाडी राहिली.
बोल्डरिंगचे जेतेपद मिळवताना त्याने 4 पैकी 3 प्रॉब्लेम्समध्ये टॉपचे स्थान संपादन केले. अमेरिकेचा कोलमन रौप्यपदकाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रियन जेकब स्कुबर्टने 45 फुटांची लीड वॉल यशस्वीरित्या सर करणारा पहिला ऍथलिट बनण्याचा मान प्राप्त केला. या चढाईमुळे त्याला कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवता आली. झेकचा क्लायम्बर ऍडम पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.
स्कुबर्टला अगदी अंतिम क्षणी तिसऱया स्थानी झेप घेता आली. लीड इव्हेंटमध्ये त्याने एक सरस गुण मिळवला आणि हाच गुण कांस्यपदकासाठी निर्णायक ठरला. जपानचा लोकल फेवरीट तोमोआ नारासकी हा देखील तिसऱया क्रमांकासाठी शर्यतीत होता. मात्र, त्याला एका गुणाने मागे, चौथ्या स्थानी रहावे लागले.
जिनेस लोपेझने स्पीड कॉम्पिटिशनमध्ये विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आणि या भक्कम आघाडीमुळे बोल्डरिंगमध्ये सात फायनलिस्टमध्ये अखेरच्या स्थानी येऊन देखील त्याला सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करता आले. जिनेस लोपेझ हा बोल्डरिंग व लीड स्पेशालिस्ट मानला जातो. या इव्हेंटमधील अंतिम लढतीत 8 ऐवजी 7 स्पर्धकांचा समावेश राहिला. प्रेंचमन बास्सा मवेम क्वॉलिफाईंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने अंतिम फेरीतून त्याला माघार घ्यावी लागली.