वृत्तसंस्था/ पॅरीस
येथे रविवारपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत रूमानियाची द्वितीय मानांकित महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपचे लक्ष महिला एकेरीच्या दुसऱया जेतेपदावर आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड बार्टीने माघार घेतल्याने हॅलेपला स्पर्धा आयोजकांनी महिला एकेरीत टॉप सिडिंग दिले आहे.
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विलीयम्सने 2017 साली आपल्या टेनिस कारकीर्दीला काही कालावधीसाठी विराम दिल्यानंतर या स्पर्धेत महिलांच्या विभागात सेरेनाप्रमाणे दुसऱया कोणत्याही महिला टेनिसपटूला आपली मक्तेदारी राखता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड बार्टीच्या अनुपस्थितीत रूमानियाच्या हॅलेपला जेतेपदाची चांगली संधी मिळाली आहे. गेल्यावर्षी बार्टीने या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तिचे हे पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद होते. जपानची अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेती नाओमी ओसाका हॅलेपची प्रमुख प्रतिस्पर्धी राहील. जेतेपदासाठी हॅलेप आणि ओसाका यांच्यात चुरस अपेक्षित आहे. दरम्यान स्पेनच्या मुगुरूझाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून तिने शनिवारी 39 व्या वर्षांत पदार्पण केले आहे.