वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट
येथे गुरूवारी झालेल्या युफा नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात स्पेन संघाने यजमान जर्मनीला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी समान एक गुण मिळाला.
या स्पर्धेतील अ गटातील या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा राहिला होता. उत्तरार्धातील खेळामध्ये वेर्नरने जर्मनीला आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास केवळ काही सेकंद बाकी असताना जोस लुईस गयाने शानदार गोल नोंदवून स्पेनला या सामन्यात बरोबरी साधून दिली. या स्पर्धेत अनेसु फेती हा सहभागी होणारा दुसऱया क्रमांकाचा कमी वयाचा फुटबॉलपटू ठरला आहे. फेतीचे वय 17 वर्षे 308 दिवस आहे. आता या स्पर्धेत स्पेनचा पुढील सामना युक्रेन बरोबर येत्या रविवारी माद्रीदमध्ये तसेच जर्मनीचा पुढील सामना स्वीस बरोबर होणार आहे.