वृत्तसंस्था/ सिडनी
रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटने सर्बियाच्या डुसान लॅजोविचवर विजय मिळवित स्पेनला एटीपी चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. त्यांची उपांत्य लढत पोलंडशी होणार आहे. पोलंडला हय़ुबर्ट हुरकाझने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर मात करून आपल्या संघाला शेवटच्या चार संघांत स्थान मिळवून दिले.
रशिया व इटली यांच्यातील विजयी संघही उपांत्य फेरीत खेळणार आहे. गुरुवारी त्यांची लढत होणार आहे. चिलीने नॉर्वेला हरविल्यानंतर स्पेनला शेवटच्या गटसाखळी लढतीत फक्त एक विजय मिळविण्याची गरज होती. पाब्लो कॅरेनो बुस्टाने विजय मिळवित त्यांचा हा हेतू साध्य केला. त्याने फिलिप क्रॅजिनोविकचा 6-3, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर बॉटिस्टाने लॅजोविचचा 6-1, 6-4 असा धुव्वा उडवित स्पेनचा विजय निश्चित केला. पोलंडला कामिल माजस्चेरझॅकने विजय मिळवून देताना फेडेरिको डेल्बोनिसवर 6-3, 7-6 (7-3) अशी मात केली. त्यानंतर हुरकाझने श्वार्ट्झमनला 6-1, 6-4 असे हरवून पोलंडला पुढील फेरीत स्थान मिळवून दिले.