बार्सिलोना/
कोरोना व्हायरस महामारीची झळ युरोपियन देशांना चांगलीच बसली आहे. इटली, स्पेन या देशांची स्थिती कोरोना व्हायरसने अत्यंत दुबळी केली आहे. स्पेनमध्ये ला लीगा फुटबॉल स्पर्धा महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाते. या स्पर्धेत 42 संघांचा समावेश असतो. ला लीगा स्पर्धा आयोजकांनी फुटबॉलपटूंसाठी बंदिस्त प्रशिक्षण शिबिरे घेण्याची योजना आखली आहे पण स्पेनमधील कोरोनाची स्थिती अद्याप गंभीर असल्याने आघाडीच्या फुटबॉल क्लबमधील फुटबॉलपटूंनी या शिबिरात दाखल होण्यास नकार दिला असल्याचे स्पेनच्या फुटबॉलपटू संघटनेतर्फे सांगण्यात आले.
स्पेनमधील फुटबॉलपटूंनी पुन्हा आपल्या नियमीत सरावाला सुरूवात करावी यासाठी ला लीगा स्पर्धेत सहभागी होणाऱया 42 संघाचे कर्णधार तसेच स्पेनच्या सेकंड डिव्हिजन विभागाचे अधिकारी यांनी स्पेनच्या फुटबॉलपटू संघटनेबरोबर व्हिडिओद्वारे चर्चा केली पण बऱयाच खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ करण्या संदर्भात चिंता व्यक्त केली. कोरोना व्हायरस परिस्थिती पूर्ववत झाली नसल्याने प्रशिक्षण शिबिराची घाई करणे योग्य ठरणार नाही, असे सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोना महामारीमुळे स्पेनमध्ये बळींची संख्या 21,000 झाली असून किमान दोन लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.