सेव्हिल्ले-स्पेन / वृत्तसंस्था
बॉल पझेशनच्या आघाडीवर तब्बल 87 टक्के वर्चस्व राखल्यानंतर देखील स्पेनला स्वीडनचा भक्कम बचाव भेदता आला नाही आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील ही रोमांचक लढत अखेर गोलशून्य बरोबरीत राहिली. स्पेनचा संघ पहिल्या सत्राअखेर गोल नोंदवण्याच्या समीप होता. मात्र, ही नामी संधी त्यांच्याकडून दवडली गेली.
स्पेनला खराब फिनिशिंगचा देखील येथे बराच फटका बसला. शॉर्ट पासेसच्या जोरावर त्यांनी स्वीडनवर वर्चस्व राखले. मात्र, बॉल पझेशनच्या आघाडीवर वर्चस्व गाजवून देखील गोल करण्यात त्यांना सातत्याने अपयश येत राहिले. उलटपक्षी, प्रतिस्पर्धी स्ट्रायकर मार्कस बर्गने संधी गमावली नसती तर स्पेनला इथे पराभवाची नामुष्की देखील पत्करावी लागली असती.
पहिल्या सत्रात अल्वारो मोराटाने स्पेनची गोल नोंदवण्याची सर्वोत्तम संधी गमावली. सेव्हिल्लेच्या ला कार्तुजा स्टेडियमवर ई गटातील या लढतीत इनसाईड एरियामध्ये मोराटाने गोल नोंदवण्याची नामी संधी निष्फळ घालवली. अर्थात, दुसरीकडे, स्वीडनचा बर्ग देखील मिळालेली संधी गमावण्यात तितकाच कारणीभूत ठरला. सहकारी फॉरवर्ड खेळाडू अलेक्झांडर इसाकने उत्तम कौशल्य दाखवत तब्बल 4 डिफेंडर्सना चकवत जबरदस्त पास मिळवून दिला होता. पण, बर्गला याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.
स्पेनने पहिल्या सत्राप्रमाणेच दुसऱया सत्रातही बॉल पझेशनच्या आघाडीवर वर्चस्व गाजवले. मात्र, येथे देखील त्यांना स्विडीश गोलरक्षक रॉबिन ओल्सनचा भक्कम बचाव अजिबात भेदता आला नाही. ‘आम्हाला या लढतीत गोल नोंदवण्याची अनेकदा संधी होती. पण, त्याचा लाभ घेण्यात आम्ही कमी पडलो’, असे स्पेनचे प्रशिक्षक लुईस एकरिक्यू म्हणाले.
‘वास्तविक, या लढतीत आम्ही विजयाचे खरे हक्कदार होतो. स्वीडनने बचावावर अधिक लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याचा बीमोड करण्यात यश येणे आवश्यक होते. आमचे फॉरवर्ड अपेक्षापूर्ती करु शकले नाहीत’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. आजवर तीनवेळा युरो चषक जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या स्पेनसाठी या स्पर्धेतील ही सुरुवात मात्र खराब ठरली. मागील 6 महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सलामीच्या लढतीत विजय मिळवता न येण्याची त्यांच्यासाठी ही पाचवी वेळ ठरली.
बॉक्स
दोन्ही संघांतील प्रत्येकी एक खेळाडू कोरोनाग्रस्त
स्पेन व स्वीडन या दोन्ही संघांना कोरोनाचा फटका बसला असून या उभय संघांचा प्रत्येकी एक खेळाडू कोरोनामुळे संघाबाहेर आहे. मात्र, स्पॅनिश ब्रिगेडला कर्णधार सर्जिओ बस्केटस हाच बाधित असल्याने याचा गेमप्लॅनवर फटका सोसावा लागला आहे. बस्केटसच्या गैरहजेरीत स्पेनच्या नेतृत्वाची धुरा जॉर्डी अल्बाकडे सोपवली गेली आहे.