‘मॅग्निफिसंट’ मेरी…
अलीकडच्या काळात अनेक महिला खेळाडूंनी समस्त भारताला अभिमान वाटावीशी देदिप्यमान कामगिरी केलेली असून त्यात समावेश होतो तो बॉक्सर मेरी कॉम हिचा. मांगते चुंगनीजांग मेरी कॉम असे मूळ नाव असलेल्या या मणिपूरच्या लढवय्या महिलेने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बॉक्सिंगच्या रिंगणात आपली अविट छाप सोडलेली असून तिच्या पराक्रमांची यादी ही फार मोठी आहे. ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे तिचे टोपण नाव ते अगदी सार्थ ठरवतात…
मणिपूरच्या कागाथेई गावात 24 नोव्हेंबर, 1982 रोजी जन्मलेल्या मेरी कॉमचे पालक हे गरीब शेतकरी. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी काही तरी करण्याचा तिचा निर्धार होता. मेरी कॉमचा खेळाकडील ओढा सुरुवातीपासून स्पष्टपणे दिसला. शाळेत ती फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळायची तसेच ऍथलेटिक्समध्ये धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायची. पुढे तिने आपल्या या क्रीडागुणांचा पाठपुरावा करण्याचे ठरवले आणि 15 व्या वर्षी ती राज्याची राजधानी इंफाळ येथील क्रीडा अकादमीत दाखल झाली. तिच्या प्रशिक्षकाच्या लक्षात आले की, मेरी कॉम फार उंच नाही आणि मजबूतही दिसत नाही, पण त्यांना जाणवली ती तिची तीव्र इच्छाशक्ती आणि एकाग्रता…
2000 मध्ये मेरी कॉमने बॉक्सिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र याविषयी तिने घरच्यांना सांगितले नव्हते. पण एके दिवशी वडिलांनी त्यांच्या जमातीतील एक मुलगी बॉक्सिंगमध्ये सहभागी होत असल्याचे वृत्त ऐकले. नंतर त्यांनी वर्तमानपत्रात तिचे छायाचित्र पाहिले. आई अधिक चौकशी करण्यासाठी गेली तेव्हा मेरी कॉम नव्याने जिंकलेल्या पदकासह सापडली. पण यश आणि प्रतिभा दिसत असूनही पालकांना तिचे बॉक्सिंमध्ये गुंतून पडणे मान्य नव्हते. कारण दुखापती होऊन तिचा चेहरा बिघडेल आणि मग विवाह होणे कठीण होईल अशी भीती वडिलांना भेडसावत होती. पण पुढे मेरी कॉमचा निर्धार पाहून त्यांचेही मन बदलल्याशिवाय राहिले नाही…
मेरी कॉमने करुंग ओंखोलर याच्याशी विवाह केला आणि दोन जुळय़ा मुलांसह त्यांना तीन मुले झाली (एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे). त्यानंतर तिने कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ब्रेक घेतला. बॉक्सिंगमध्ये परत येण्यास ती मागे-पुढे होत होती. परंतु याबाबतीत पती हाच तिचा सर्वांत मोठा समर्थक बनला. त्याने मुलांना पाहता यावे आणि मेरी कॉमला आपला बॉक्सिंगमधील प्रवास सुरळीतपणे करता यावा याकरिता स्वतःचे काम देखील सोडले. मेरी कॉमची पुढची वाटचाल सर्वांना माहीत आहे. ऑलिम्पिकमधील यशानंतर तिने इंफाळमध्ये बॉक्सिंग अकादमी उघडली आणि 2016 मध्ये राष्ट्रपतींनी तिची राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. 2018 मधील सहाव्या जागतिक विजेतेपदानंतर मणिपूर सरकारने तिला ‘मिथोई लीमा’ ही पदवी (म्हणजे महान किंवा अपवादात्मक महिला) बहाल केली, तर 2020 मध्ये पद्मविभूषणाने गौरविण्यात आले. मेरी कॉमच्या जीवनप्रवासावर हिंदी चित्रपटही आलेला असून त्यात तिची भूमिका प्रियांका चोप्राने केली होती. ‘माझ्याकडे एक उदाहरण म्हणून पाहा आणि हार मानू नका,’ असे मेरी कॉम नेहमी म्हणते…
आंतरराष्ट्रीय मंचावर मेरी कॉम शेवटची झुंजताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसली होती. तिथे उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या बॉक्सरकडून 3-2 च्या फरकाने पराभूत व्हावे लागले. यावर्षी जूनमध्ये राष्ट्रकुल खेळांसाठीच्या चाचण्यांदरम्यान तिला दुखापत झाली तेव्हा अनेकांना तिची कारकीर्द आता संपते की काय अशी भीती वाटली होती. तरीही, शस्त्रक्रियेनंतर ती आता बऱयापैकी सावरलेली असून परत येण्याचे वेध लागले आहेत. ‘मला अजूनही यशाची भूक आहे. निवृत्त होण्यापूर्वी एका मोठय़ा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे’, असे ती म्हणते…
तथापि, मेरी कॉम पुढील महिन्यात 40 वर्षांची होईल. याचा अर्थ ती पॅरिस ऑलिम्पिक किंवा पुढील वर्षीच्या आशियाई खेळांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. कारण या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी 40 वर्षांची मर्यादा घालण्यात आली आहे. ‘मला माहीत आहे की, वयाचा अडथळा आहे, तरीही मला स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे. लोकही मला रिंगणात पाहू इच्छितात’, असे तिने म्हटले आहे…
मेरी कॉमला तिच्या शस्त्रक्रियेनंतर सहा महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलेला असला, तरी ती लवकर रिंगणामध्ये परतण्यास उत्सुक आहे. ‘मी हे आव्हान म्हणून घेतले आहे. मला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण तंदुरुस्ती मिळवायची आहे. ‘तीन-चार महिन्यांपूर्वी, मी माझ्या गुडघ्याचा फक्त 10 टक्के भाग वाकवू शकले होते. ते हळूहळू 100 टक्के होईल. हळूहळू गतिशीलता आणि ताकद परत येईल’, ती आशावादी स्वरात म्हणते !
एकमेवाद्वितीय…
- जागतिक हौशी बॉक्सिंग स्पर्धा सहा वेळा जिंकणारी तसेच पहिल्या सात जागतिक स्पर्धांमध्ये प्रत्येकी एक पदक पटकाणारी ती एकमेव महिला बॉक्सर. महिलाच नव्हे, तर पुरुषांचा देखील विचार करता जागतिक स्पर्धेत आठ पदकांची कमाई करून दाखविणारी ती एकुलती एक बॉक्सर…
- 2012 च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली मेरी कॉम एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. तिथे तिने फ्लायवेट (51 किलो) गटात कांस्यपदक जिंकून इतिहास घडविला…
- आंतरराष्ट्रीय हौशी बॉक्सिंग संघटनेकडून तिला मध्यंतरी ‘लाइट-फ्लायवेट’ गटातील जागतिक क्रमवारीत अग्रस्थान बहाल करण्यात आले होते.
- 2014 मध्ये दक्षिण कोरिया येथे ‘एशियाड’मध्ये सुवर्णपदक जिंकणारी आणि 2018 साली राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर…
- विक्रमी सहा वेळा आशियाई हौशी बॉक्सिंग जेतेपद मेरी कॉमने मिळविलेले असून अशी कामगिरी करणारी ती एकमेव बॉक्सर…
मेरी कॉम कशी राखते तंदुरुस्ती ?…
- तीन मुलांची आई असलेल्या मेरी कॉमने ज्या प्रकारे आपली तंदुरुस्ती वयाच्या चाळिशीत पोहोचूनही राखली आहे ते कौतुकास्पदच. सध्या शस्त्रक्रियेतून सावरत असल्याने तिला सावकाश जावे लागत आहे…
- अन्यथा ‘रूटीन’नुसार ती दिवसाची सुरुवात 14 किलोमीटर धावून करते. हे चरबी जाळून एक उत्तम कार्डिओ व्यायाम देखील देते. मग ती ‘स्कीपिंग’कडे वळते, ज्यामुळे तिच्या पायाचे स्नायू ‘टोन’ होतात आणि संतुलन, चपळता सुधारते…
- त्यानंतर ‘रशियन ट्विस्ट’, ‘व्ही-अप्स’, ‘वॉकिंग प्लँक्स’ आणि ‘बॉक्सिंग’चा सराव, ‘शॅडो बॉक्सिंग’, ‘पंचिंग बॅग्स’ नि ‘स्पीड बॅग-ड्रिल्स’…
- दुपारी जिममध्ये जाऊन स्नायू मजबूत ठेवण्यासाठी ‘पुश-अप्स’, ‘सिट-अप्स’, वजन उचलणे आदी व्यायाम. यानंतर पुन्हा बॉक्सिंगचा सराव. शारीरिक तंदुरुस्तीवर काम करण्याव्यतिरिक्त मेरी कॉम तिच्या मानसिक आरोग्याचीही व्यवस्थित काळजी घेते…
संतुलित आहारास प्राधान्य…
मेरी कॉम अधिक प्रथिने किंवा कार्बोहायड्रेट्स घेण्याऐवजी संतुलित आहारास प्राधान्य देते. ती शिस्तबद्ध खाण्याचे वेळापत्रक राखते. तिच्या दिवसाची सुरुवात हेल्थी ड्रिंकने होते. पाठोपाठ एक भारी नाश्ता केला जातो, ज्यामध्ये हिरव्या भाज्या, फळांचा रस, अंडी आणि ब्रेडचा समावेश असतो. दुपारच्या व रात्रीच्या जेवणात वाफवलेला भात, डाळ, मांस, भाज्या आणि रोटय़ांचा समावेश. मेरी कॉम कमी मसालेदार जेवण पसंत करते आणि स्वतःला ‘हायड्रेट’ ठेवण्यासाठी दिवसभर फळांचे रस आणि पाणी घेते…