आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा : गोव्याच्या बाजूने खोल समुद्रात सुरू होती प्रात्यक्षिके : सागरी सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा
वार्ताहर / मालवण:
मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे 50 किमी लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळय़ा बसविणारा तो आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात सुरू केलेल्या प्रात्याक्षिकांचा असल्याचे सागरी सुरक्षा यंत्रणेशी संबधित विभागाकडून सांगण्यात आले. मात्र ही प्रात्याक्षिके समुद्रात नेमकी किती दूरवर सुरू होती, याविषयीची विस्तृत माहिती सुरक्षा यंत्रणेकडून गोपनियतेच्या कारणास्तव देण्यात आली नाही.
गुरुवारी सकाळी अकरा वाजून 40 मिनिटांनी मालवण, देवगड किनारपट्टसह किनारपट्टीपासून आत 25 किमी दूरवरच्या गावांमध्येही हा स्फोटसदृश आवाज ऐकू आला. मालवणात देवबाग ते आचरापर्यंतच्या किनाऱयावर जोरदार आवाजामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले. काचेच्या खिडक्या आणि पत्रे आदींवर आवाजाचा परिणाम जास्त जाणवला. काही ठिकाणी पत्रे उडाल्याचेही वृत्त आहे. एवढा हा आवाज तीव्र होता. परंतु आवाजाविषयी नेमके कारण समजू न शकल्याने अनेकांनी एकमेकांना मोबाईलवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. मालवण पोलिसांकडे याबाबत विचारणा करण्यात आली, पण आवाज नेमका कशाचा होता याचा उलगडा होत नव्हता. सागरी सुरक्षेशी संबंधित यंत्रणांनी तटरक्षक दल आणि नौदलाशी संबंधित विभागांकडे या संदर्भात खातरजमा केली असता गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाची प्रात्यक्षिके सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत सागरी सुरक्षा यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला.
मच्छीमारांनी अनुभवला आवाज
स्फोटसदृश आवाजाबाबत मासेमारीस गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क साधला असता त्यांनी खोल समुद्रातून आवाज आल्याचे स्पष्ट केले. संबंधित मच्छीमार मालवण बंदरासमोर 23 वाव खोल समुद्रात मासेमारी करीत होते. परंतु या आवाजाचा समुद्राच्या पाण्यावर किंवा प्रवाहावर आपणास कोणताच परिणाम जाणवला नसल्याचे मच्छीमारांनी सांगतिले. दरम्यान नौदलाची प्रात्यक्षिके 12 सागरी मैलापलिकडे खोल समुद्रात सुरू असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
नागरिकांमधून नाराजी व्यक्त
सदरील आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा होता, असे स्पष्ट झाले असले तरी अशा प्रकारची प्रात्यक्षिके करायची असल्यास अशा प्रकारचे घबराटीचे वातावरण अथवा कुठल्याही प्रकारचे नुकसान होता नये, याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. तसेच अशा प्रकारची प्रात्यक्षिके घ्यायची असल्यास स्थानिक प्रशासनाकडून नागरिक व प्रशासनास पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची सूचना मांडण्यात आली.
अमेरिकन जहाजांच्या पार्श्वभूमीवर…अनेक तर्कवितर्क
स्फोटसदृश आवाज ऐकू आल्यानंतर मालवणातील नागरिकांमधून या आवाजाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. काहींनी भूपंक झाल्याचे, तर काहींनी सुरुंग लावल्याने अशा प्रकारचा आवाज ऐकू आल्याची शक्यता व्यक्त केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप या ठिकाणच्या भारतीय सागरी हद्दीत अमेरिकेन नौदलाचे जहाज विनापरवाना घुसल्याच्या पार्श्वभूमीवर तर समुद्रात काही घडामोडी तर घडत नाही ना, असादेखील सवाल उपस्थित केला जात होता.