प्रतिनिधी/ कराड
जिलेटिनच्या कांडय़ांचा स्फोट करून एटीएम उडवण्याच्या कटात सहभागी डॉक्टरसह तिघांच्या शोधासाठी कराडसह जिल्हा पोलीस दलातील तीन पथके रवाना झाली आहेत. या टोळीने जिलेटिन आणले कोठून? त्यांच्याकडे आणखी किती जिलेटिनचा साठा आहे? या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास घेण्यात पोलीस यंत्रणा गेल्या चोवीस तासापासून गुंतली आहे. दरम्यान अटकेतील संशयित सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे, मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड) याला न्यायालयासमोर हजर केले असता 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
शुभंतू अशोक पोळ (वय 28, रा. करवडी, ता. कराड), अशोक झांबरे (वय 35, रा. अहमदनगर) व महाराज नावाच्या तीन संशयितांना जेरबंद करून या कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराडलगतच्या गजानन हौसिंग सोसायटी येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या काडय़ांचा स्फोट करून उडवण्याचा कट रचत चार संशयित सोमवारी पहाटे तयारीत होते. रात्रगस्त घालणाया पोलीस पथकाला वेळेत माहिती मिळाल्यावर हवालदार जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी, संग्राम पाटील, होमगार्ड निकम यांनी घटनास्थळी धाव घेत चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरटय़ांनी विषारी औषधांचा स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. याचा फायदा घेऊन तिघे चोरटे पसार झाले. मात्र एका संशयिताला पोलिसांनी पकडला.
कट नेमका रचला कोठे?
जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर करून एटीएम उडवण्याच्या कटातील सहभागी उच्चशिक्षित आहेत. त्यांनी हा कट नेमका रचला कधी? तो रचण्यापूर्वी त्यांनी नेमके कोठे कोठे पाळत ठेवली होती. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत. कारण जिलेटिनचा स्फोट करून एटीएम उडवण्याचा जिह्यातील पहिलाच गुन्हा आहे. या गुह्याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. मंगळवारी दिवसभर अटकेतील संशयित सचिन वाघमोडे याच्याकडे गोपनीय स्थळी चौकशी सुरू होती.
जिलेटिनच्या कांडय़ा आणल्या कोठून ?
जिलेटिनचा स्फोट घडवण्याचा कट रचण्यासाठी जिलेटिनचा साठा नेमका आणला कोठून यासह या कटात कराडचे स्थानिक कनेक्शन समोर आल्याने पोलिसांच्या तपासाला गती आली आहे. या संशयितांनी वापरलेले जिलेटिन तेवढेच होते की आणखी काही साठा त्यांनी करून ठेवला आहे याची माहिती घेण्यात पोलीस व्यस्त आहेत.
स्फोट नाईलाजास्तव करावा लागला
चोरटय़ांनी एटीएम फोडण्यासाठी जिलेटिनच्या काडय़ांचा वापर केला होता. त्या कांडय़ा मशीनमध्ये ठेवल्याने त्या निकामी करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र एटीएम मशीनमध्ये अडकलेल्या कांडय़ा बाहेर काढता आल्या नाहीत, किंबहुना निकामीही करता आल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांनी त्या कांडय़ांचा एटीएम मशीन मध्येच स्फोट करत अगदी काळजीपुर्वक त्या निकामी केल्या. त्यानंतर एटीएम मशीन मधून सुमारे साडेआठ लाखांची रोख रक्कम सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले.
तीन जिह्यातील पोलीस कराडात
जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी सकाळीच कराड गाठले. या पोलिसांनी स्वतंत्रपणे अटकेतील संशयिताकडे चौकशी करत यापुर्वीच्या स्फोटांबाबत कसून विचारपूस केली. या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते.