प्रतिनिधी /म्हापसा
माडेल थिवी येथील मुक्तीधाम स्मशानभूमीच्या जळाऊ लाकडांच्या गोदामाला अज्ञात व्यक्तीनी आग लावल्याने गोदामात साठवून ठेवलेली तसेच गोदामाच्या बाहेर निवारा शेडमध्ये मांडून ठेवलेली अंदाजे दीड लाखाची लाकडे जळून खाक झाली असल्याची माहिती स्मशानभूमीचे अध्यक्ष चंद्रकांत साळगांवकर यांनी दिली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाकडांना आग लागल्याने संपूर्ण गोदामाची तसेच निवारा शेडची नासधूस झाल्याने अतिरिक्त साडेतीन लाखाची नुकसानी झाल्याचे मुक्तीधामचे सचिव लवू कोरगांवकर यांनी सांगितले.
आग लावण्याचा प्रकार दि. 1 मार्च किंवा 2 मार्च रोजी झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु स्मशानभूमी समितीला मात्र याची खबर 4 मार्च रोजी समजली. समितीचे सर्व सदस्य तसेच पंच सदस्य अर्जुन आरोसकर, पत्रकार प्रा. सुभाष कौठणकर यांनी स्मशानभूमीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कित्येक वर्षापासून सर्व सोयीनियुक्त असलेली स्मशानभूमी नव्हती. मोठा संघर्ष करीत आरडीएमार्फत या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. उंच भींत तसेच मोठा लोखंडी दरवाजा असताना कुणी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याबद्दल समितीने खेद व्यक्त करून कोलवाळ पोलीस स्थानकात याची रितसर तक्रार करण्यात आली आहे. तसेच थिवी पंचायत कार्यालयालाही याची लिखित माहिती देण्यात आली आहे. पोलसांनी लवकरात लवकर त्या व्यक्तीना शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.