निलजी येथे जुन्या परंपरेला फाटा
सांबरा : एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर रक्षाविसर्जन दिवशी त्याच्या नावाची पाटी म्हणून दगड रोवण्याची गेली कित्येक वर्षे परंपरा आहे. निलजी परिसरातही परंपरा जपली जात होती. पण काही सुजाण नागरिकांच्या कल्पनेतून या जुनाट कल्पनेला फाटा देऊन मयत व्यक्तीच्या नावे एक झाड स्मशानभूमीत रोवण्याची परंपरा निलजी येथे गुरुवारपासून सुरू झाली. ही संकल्पना राबविण्यासाठी निलजी येथील पाटील कुटुंबीयांनी पुढाकार घेतला. श्रीमती लक्ष्मीबाई भावकाण्णा पाटील या महिलेचे दि. 21 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी रक्षाविसर्जन असल्याने लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावे आज एका झाडाचे रोपण निलजी स्मशानभूमीत करण्यात आले. हा उपक्रम राबवत असताना भाऊराव पाटील, सुनील पाटील, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, यल्लाप्पा पाटील, प्रसाद पाटील यांनी परिश्रम घेतले.