वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये लोकसंखेने मोठ्या असलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम योजनेत प्रथम क्रमांक पटकावत दहा लाखाचे पहिले बक्षीस मिळवले.
शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी झालेवर हातकणंगले पंचायत समितीच्या परिक्षक कमिटीने कोडोली ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामाची पाहणी करून त्याचा अहवाल शासनास सादर केला होता. सर्व ग्रामपंचतीचा अहवालातून पन्हाळा तालुक्यातून कोडोली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. हे बक्षीस जाहीर होताच कोडोली येथील सर्वोदय चौकात ग्रामस्थानी काल, मंगळवारी (दि. १४) रात्री फटाक्यांची आतषबाजी करत साखर पेढे वाटून आनंदोत्स साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन सरपंच शंकर पाटील, उपसरपंच निखील पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम, सर्व सदस्य, कर्मचारी यांनी ग्रामस्थांना साखर पेढे वाटप केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे व पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती गीतादेवी पाटील यांनी स्मार्ट ग्राम योजनेतील यशाबद्दल सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम व सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.