प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचा स्मार्टसिटीमध्ये समावेश झाल्यानंतर स्मार्टसिटीच्या कामांना सुरूवात झाली. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे बेळगावच्या जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. तेंव्हा ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशी सूचना कर्नाटक सरकारचे मुख्य प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी स्मार्टसिटीच्या अधिकाऱयांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून त्यांनी अधिकाऱयांना विविध समस्या सांगून त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले. स्मार्टसिटी अंतर्गत रस्ते, बस स्टॉप व इतर कामे सुरू आहेत. त्या कामांचा वेग अत्यंत कमी आहे. वास्तविक ही सर्व कामे आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र सर्वच भागातील कामे ही अत्यंत संथगतीने सुरू असून तातडीने ही कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, स्मार्टसिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर, महापालिका आयुक्त एच. जगदीश यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.