प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटीची कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्याचा फटका बेळगावकरांना बसत आहे. या अर्धवट कामांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अशीच घटना घडली. स्मार्टसिटीच्या अर्धवट कामांमुळे बाहेर पडलेली लोखंडी सळी घुसून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मध्यवर्ती बस स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.
शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर स्मार्टसिटी अधिकाऱयांच्या नावे नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यापूर्वीही अर्धवट कामांमुळे अपघात किंवा इतर घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले जात नाही. गरीबांच्या जीवाला किंमत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मेहमुद अब्दुलदस्तगीर मुल्ला (वय 65, रा. न्यू गांधीनगर) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. मध्यवर्ती बस स्थानकासमोरुन चालत जाताना तोल जाऊन तो सळीवर पडला. त्याआधी या मार्गावरुन दुचाकीवरुन जाणारी एक महिलाही याच परिसरात पडली होती. या संबंधीची छायाचित्रे रात्री सोशल मीडियावरुन व्हायरल झाली.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर दुभाजाकाचे काम सुरू आहे. ते अर्धवट अवस्थेत आहे. त्यासाठी घालण्यात आलेल्या लोखंडी सळी उघडय़ावर आहेत. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱया अनेकांना इजा पोहोचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शनिवारी रात्री याच मार्गावरुन जाणारा एक वृद्ध दुभाजकाच्या उघडय़ा सळींवर पडला. त्याच्या गळय़ात सळी घुसून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार उघडकीस येताच रिक्षा चालक व नागरिकांनी तातडीने जखमी वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. मात्र हॉस्पिटलला पोहोचण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्मार्टसिटी यंत्रणेविरूद्ध संताप
वारंवार घडणाऱया अशा घटनांमुळे स्मार्टसिटी यंत्रणा व कंत्राटदारांविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी रात्री गांधीनगर येथील वृद्धाच्या गळय़ात सळी घुसून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी स्मार्टसिटीच्या नावे शिमगा केला. अभियंते व कंत्राटदारांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.