52 गाळय़ांचा लिलाव करण्यासाठी मनपाकडून हालचाली
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. उर्वरित गाळे आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसथांब्यांवर उभारण्यात आलेले किओस्क शॉप भाडेतत्त्वावर देण्यासाठी लवकरच लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 52 गाळय़ांसाठी बोली लागणार असून बोलीची तारीख मनपाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
महापालिकेला विविध माध्यमातून महसूल मिळतो. मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलांतील गाळय़ांच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळते. जानेवारी महिन्यात 140 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव करण्यात आला होता. पण यापैकी 38 गाळय़ांना बोली लागली नाही. त्यामुळे पुन्हा लिलाव आयोजित करण्यात येणार होता. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे लिलाव प्रक्रिया रखडली होती. अलीकडेच अनलॉक झाल्याने गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी बोली न लागलेल्या 38 गाळय़ांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या मुदतीत अनामत रक्कम भरणा केली नसल्याने चार गाळय़ांचा पुन्हा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली असून दहा बसथांब्यांवर किओस्क शॉप उभारण्यात आले आहेत. सदर किओस्क शॉप भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटीकडून महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामुळे हे दहा गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिका लिलाव प्रक्रिया राबविणार आहे. महापालिकेच्यावतीने 52 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून याकरिता मनपाने हालचाली चालविल्या आहेत. लिलाव आयोजित करण्याची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.