प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसव नगरमधील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी स्मार्ट रोडवरील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एका गाळय़ाला प्रतिमहिना 12 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. मात्र, बोलीधारकांची गर्दी वाढल्याने एका गाळय़ाची बोली चक्क 33 हजार रुपयापर्यंत पोहचली.
महापालिकेच्या विविध गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. काही गाळे नव्याने भाडेतत्त्वावर देण्यात येत आहेत. 154 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महात्मा फुले भाजी मार्केट पाठोपाठ शिवबसव नगरमधील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. या परिसरात शाळा, महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या परिसरातील गाळय़ांचे महत्त्व वाढले आहे. या परिसरात सरकारी कार्यालये असल्याने खासगी व्यापारी संकुल आणि गाळे नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या गाळय़ाचे महत्त्व वाढले आहे.
स्मार्ट रस्त्यावर असलेल्या 14 गाळय़ांकरिता सोमवारी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत 38 नागरिकांनी सहभाग घेतला होता. पण 14 पैकी 4 गाळे मागासवर्गीयांसाठी व अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 10 गाळे खुल्या वर्गासाठी होते. मात्र, यावेळी केवळ खुल्या वर्गातील 10 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या गाळय़ांकरिता नव्याने लिलाव प्रकिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 4 गाळय़ांचा लिलाव झाला नाही. मात्र, 10 गाळय़ांकरिता 38 नागरिकांनी सहभाग घेऊन बोली लावली होती. पन्नास हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. एका गाळय़ासाठी दोन लाख रुपये अनामत रक्कम आणि 12 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. बोलीवेळी चढाओढ वाढल्याने स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे एका गाळय़ाकरिता 33 हजार रुपयांपर्यंत बोली लागली. किमान 21 हजार रुपये बोली लागली आहे. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या भाडय़ाच्या रक्कमेपेक्षा जास्त भाडे मिळाले आहे. बोलीवेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
शहरात सर्वाधिक भाडे मिळवून देणारे गाळे ठरले असून महापालिकेला 10 गाळय़ांच्या माध्यमातून वर्षाला 30 लाखपर्यंत महसूल मिळणार आहे. लिलाव प्रक्रियेवेळी महापालिकेचे महसूल अधिकारी सतीश अनिशेट्टर, कायदा अधिकारी यु.डी. महांतशेट्टी, लेखाधिकारी बजंत्री, आनंद होंगल, सुशांत कांबळे, साहाय्यक महसूल अधिकारी रवि मास्तीहोळीमठ, व्यवस्थापक फारुक यड्रावी, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, शिवा जाधव आदींसह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.