रिफ्लेक्टर फुटून लोखंडी बार उघडे, वाहने पंक्चर होण्याच्या प्रकाराने संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील पहिला स्मार्ट सिटीअंतर्गत केएलई समोरील केपीटीसीएल रस्ता करण्यात आला. या रस्त्याला रिफ्लेक्टर बसविण्यात आले. मात्र, रस्त्याच्या मधोमध असलेले रिफ्लेक्टर फुटून गेले असून लोखंडी बार वर आले आहेत. त्यामुळे वाहने पंक्चर होत आहेत. पहिल्याच रस्त्याची ही अवस्था. त्यामुळे स्मार्ट सिटीतील रस्ते किती दिवस तग धरणार हे आता समजणे अवघड झाले आहे.
केपीटीसीएल समोरील हा रस्ता तब्बल तीन वर्षांनंतर पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा पाईप घालण्यासाठी त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा लागला. एकूण स्मार्ट सिटीची कामे म्हणजे राम भरोसे असून हा संपूर्ण निधी वाया जाणार का? अशी भीती जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
रस्ता किंवा इतर कामांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. केवळ रात्रीच्या वेळी रस्ते करून त्याच्यामध्ये लोखंड घातले जात नाही. त्यामुळे काही रस्त्यांना आताच भेगा पडताना दिसत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत आता केवळ 25 ते 30 टक्केच काम झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्वी केलेले रस्ते तग धरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिफ्लेक्टर खराब झाल्यामुळे आता बार वर आलेत. त्या बारवरून चार चाकी किंवा दुचाकी जाताच ती पंक्चर होऊ लागली आहे. त्यामुळे इतर भागांतीलही रस्त्यांची अवस्था अशीच होणार का? अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. कॉलेज रोडवरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता फुटपाथला लागूनच काँक्रीट घातले जात आहे. मात्र, त्यामध्ये लोखंडी बार घालण्यात येत नाहीत. त्यामुळे हे काँक्रीट किती दिवस टिकणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱयांना विचारले असता ते कंत्राटदाराकडे बोट दाखवत आहेत. त्याला फोन केला असता तो फोन घेण्यास तयार नाही. त्यामुळे एकूणच स्मार्ट सिटीचा आलेला हा निधी पूर्ण वाया जाणार अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. तेव्हा अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन जे काम सुरू आहे ते योग्य प्रकारे व त्याचा दर्जा चांगला ठेवावा, अशी मागणी होत आहे.