केपीटीसीएल रोडवर वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा केपीटीसीएल रोड हा वाहतुकीसाठी की, पार्किंगसाठी करण्यात आला, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. रस्त्यावरच दोन-दोन वाहने पार्किंग केली जात असल्याने ये-जा करणाऱया वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे यासाठीच कोटय़वधी रुपये खर्च केले का, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
स्मार्ट सिटीने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून केपीटीसीएल रोडची निर्मिती केली. काँक्रीटच्या रस्त्यासोबतच बाजुने फूटपाथची व्यवस्था करण्यात आली. तसेच याच रोडवर नागरिकांना पदार्थांचे आस्वाद घेता यावे यासाठी लहान स्टॉल उभारण्यात आले. परदेशातील रस्त्यांप्रमाणे या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता पाहण्यासाठी अनेकजण या ठिकाणी येतात.
परंतु हा कोटय़वधीचा खर्च पाण्यात जात असल्याची तक्रार परिसरातील रहिवासी करीत आहेत. रस्ता मोठा झाल्याने या रस्त्यावर वाहने पार्किंग केली जात आहेत. केवळ एकच नव्हे तर दोन-दोन वाहने पार्किंग केली जात आहेत. यामुळे या रस्त्याची निर्मिती पार्किंगसाठीच झाली का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे रस्त्याशेजारी चुकीच्या पद्धतीने वाहने लावणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.