बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा कायापालट करण्यात येत आहे. त्यासाठी विविध भागात विकासकामे राबविण्यात आलेली आहेत. पण ही विकासकामे नागरिकांसाठी आता डोकेदुखी बनू लागली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस रोडवर स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. मात्र हे काम पूर्ण करण्याकडे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे.
येथील रस्त्याचे व्हाईट टॉपिंग व गटारींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला भूमीगत वाहिन्या तशाच टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच येथील गटारीच्या बाजूस असलेली चरदेखील बुजविण्यात आली नसल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी रस्त्याच्या बाजूने पेव्हर्स बसविण्याऐवजी पहिले रेल्वे गेटजवळ बॅरिकेड्सच्या बाजूला पेव्हर्सचा थर रचून ठेवलेला पाहायला मिळत आहे.
अर्धवट काम तातडीने पूर्ण करा
काँग्रेस रोडवर अनेक दुकाने आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटीचे काम अर्धवट असल्यामुळे व्यावसायिकांना फटका बसत आहे. तसेच हे काम पूर्ण झाले नसल्यामुळे अनेक नागरिकदेखील यामध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे येथील अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.