हिंदवाडी परिसरातील उखडून टाकण्यात आलेले साहित्य बसविण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीची कामे करण्यात येत आहेत. मात्र ही कामे राबविताना कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेले डस्टबिन उखडून टाकल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील आरपीडी महाविद्यालयापासून ते हिंदवाडी रस्त्यापर्यंत फूटपाथवर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आणि फूटपाथच्या बाजूने लावण्यात आलेले शोभेचे दिवेदेखील उखडून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था केली आहे. तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी फूटपाथच्या बाजूने शोभेचे दिवे बसविले असून दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. मात्र शहरात विकासकामे राबविताना या गोष्टी उखडून टाकल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
येथील आरपीडी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर फूटपाथवर लावण्यात आलेला बोर्ड, शोभेचे दिवे आणि कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले डस्टबिन विकासकामे राबविताना उखडून टाकण्यात आले आहेत. मात्र सदर काम पूर्ण होऊनदेखील ते उखडून टाकण्यात आलेले साहित्य परत बसविण्यात न आल्याने शहरात कोणत्या प्रकारचे स्मार्ट वर्क चालू आहे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.